जळगाव- लॉकडाऊनच्या काळात सर्वच दारू विक्रीची दुकाने बंद आहेत. याचाच गैरफायदा घेत जळगाव तालुक्यातील भोलाणे शिवारात गावठी दारू निर्मिती करून त्याची तस्करी करण्याचा डाव दारू तस्करांनी आखला होता. मात्र, तालुका पोलिसांनी हा डाव बुधवारी (दि. 1 एप्रिल) उधळून लावला. भोलाणे येथील तापी नदीपात्रात सुरू असलेले गावठी दारू निर्मितीचे 5 अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, यावल पोलिसांनी देखील एकाला दारूची अवैध विक्री करताना पकडले आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र आस्थापने बंद आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन काही जण भोलाणे येथे तापी नदीपात्रात गावठी दारू तयार करुन त्याची परिसरात विक्री करत होते. याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने बुधवारी पहाटे 5 वाजताच तापी नदीचे पात्र गाठले. पोलीस आल्याची चाहूल लागल्यानंतर दारू निर्मिती करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी एकूण 5 अड्डे उद्ध्वस्त केले. त्यात 7 हजार 600 लीटर कच्चे, पक्के व काही उकळते रसायन होते. सुमारे 1 लाख 52 हजार रुपयांचे रसयान, 32 हजार 200 रुपये किंमतीची तयार झालेली गावठी दारू, 20 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी, 35 लीटरच्या 23 टाक्या, 38 पत्री टाक्या, असा एकूण 2 लाख 4 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारू व रसायन पेटत्या भट्टीत नष्ट करण्यात आल्या. या प्रकरणी अज्ञात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.