जळगाव - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर निराशाजनकच आहे. देशातील ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका आहेत; त्या राज्यांना अर्थसंकल्पात झुकते माप देण्यात आले आहे. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात विशेष असे काहीही नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रासाठी विचार केला तर अर्थसंकल्प निराशाजनक- एकनाथ खडसे - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर निराशाजनकच आहे. देशातील ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका आहेत; त्या राज्यांना अर्थसंकल्पात झुकते माप देण्यात आले आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ खडसे सोमवारी दुपारी जळगावात आले होते. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे पुढे म्हणाले, अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने ठोस घोषणा होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ही घोषणा फोल ठरली. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, रोजगार निर्मिती त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा अशा सर्वच पातळ्यांवर अर्थसंकल्पात निराशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र, ही घोषणा जुनीच आहे. त्यात नवीन काही नाही. देशभरातील लहान सिंचन प्रकल्पांसाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ती खूप कमी वाटते. एकंदरीतच काय तर अर्थसंकल्प निराशाजनकच आहे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली.
उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नच नाही-
अर्थसंकल्पाबाबत बोलायचे झाले तर देश आणि राज्याच्या उत्पन्नवाढीसाठी त्यात ठोस घोषणा करण्याची गरज होती. मात्र, त्याबाबतीत केंद्र सरकारने काहीही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी निधीची तरतूद केली आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. परंतु, उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीत मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग तसेच रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रवासीयांची अर्थसंकल्पात निराशाच झाली आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.