जळगाव - जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढावा, म्हणून हरिभाऊ जावळेंनी खूप काम केले. आज जिल्ह्यात जो भारतीय जनता पक्ष वाढला, त्यात हरिभाऊंचा खूप मोलाचा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे आपल्यातून असे अचानक निघून जाणे खूपच वेदनादायी आहे. मी एक चांगला सहकारी गमावला आहे, अशा भावना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्या आहेत.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः केळी उत्पादकांच्या हितासाठी ते सदैव लढत राहिले. कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न केले. राजकीय क्षेत्रात राहून समाजकारण कसे करावे? हे अनेकांना शिकवले. जिल्ह्यातील जनतेशी त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मनात कधीच अहंकार आला नाही. हरिभाऊंचे आणि माझे नाते कौटुंबिक स्वरुपाचे आहे. त्यांनी आयुष्यात कधीच या कौटुंबिक प्रेमात दरी निर्माण होऊ दिली नाही. हरिभाऊंच्या जाण्याने आज पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
समाजाचे सुद्धा मोठे नुकसान आहे. असे नेतृत्व घडायला खूप वर्ष लागतात. हरिभाऊंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघण्यासाठी आहे. सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष अशा प्रकारचे काम केले. विशेषत: मधुकर सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन राहिले. या काळामध्ये साखर कारखान्याला चांगले दिवस यावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.