जळगाव - "गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती आहे. त्यांना राजकारणात जन्माला मी आणले", अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक द्वंद्व रंगले आहे. ही क्लिप समोर आल्यानंतर गिरीश महाजन यांनी नाशकात खडसेंना लक्ष्य करत, खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याचे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना खडसेंनी महाजन यांचा खरपूस समाचार घेतला.
प्रतिक्रिया देताना माजी मंत्री एकनाथ खडसे हेही वाचा -आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे सॉफ्टबॉल खेळाडू गुणवत्ता शिष्यवृत्तीपासून वंचित; राज्य सरकारने दखल घेण्याची मागणी
खडसे नेमके काय म्हणाले?
माझी तब्येत ठणठणीत आहे. त्यांना खात्री करायची असेल तर ते करू शकतात. गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून, त्यांना राजकारणात जन्माला मी आणले. जामनेर तालुक्यातून मला लोकांचे फोन येत आहेत. तालुक्यात पाणीटंचाईची समस्या आहे. कोरोनामुळे तिथे मुडदे पडत आहेत. असे असताना गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. 1994, 1995 मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांची काय घटना घडली होती, ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यामुळे, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांना राजकारणात मी आर्थिक मदत दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरलो, म्हणून आज ते दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही, की कोणाचे पाय चाटत नाही, असेही खडसे म्हणाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य असलेली एक ऑडिओ क्लिप गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एकनाथ खडसे हे जामनेर तालुक्यातील एका व्यक्तीसोबत बोलत आहेत. तेव्हा खडसेंनी महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याच विषयावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी, मी खडसे यांना दोष देणार नाही. जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाही. त्यामुळे, त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे आहे, अशी टीका केली होती.
हेही वाचा -जळगावात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; अपशकुनी समजून वडील छळ करत असल्याची मामाची तक्रार