जळगाव -माजीमंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसे 'ऍक्शन मोड'मध्ये आले असून, त्यांनी जळगाव जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीच्या पक्षसंघटन वाढीसाठी खडसेंनी पहिला 'सर्जिकल स्ट्राईक' त्यांचे राजकीय हाडवैरी माजीमंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघावर केला आहे. मंगळवारी (दि. 2 नोव्हेंबर) दुपारी जामनेर तालुक्यातील सुमारे पावणे दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी खडसेंच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघातील देवपिंपरी, नेरी या गावातील पावणे दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे. जामनेर तालुका हा गिरीश महाजन यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. गेल्या 5 पंचवार्षिक निवडणुकांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. असे असताना खडसेंनी याच मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आपल्या बाजूने वळवल्याने हा गिरीश महाजन यांना मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी येईल - खडसे
जामनेर तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे कार्यकर्ते यापूर्वी भाजपचे नि:स्वार्थपणे काम करत होते. त्यातील काही कार्यकर्ते हे भाजपचे पदाधिकारी होते, तर काही कार्यकर्ते हे आजही भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करत होते. परंतु, अलीकडे ते पक्ष नेतृत्त्वावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. यापुढच्या काळात असे अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे राष्ट्रवादीला अधिक बळकटी येईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय होणार - रवींद्र पाटील