जळगाव - जिल्हा प्रशासनाला रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालांमध्ये ७५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात जळगाव शहरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. काल (शनिवार) देखील ७५ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज पुन्हा ७५ रुग्ण आढळून आल्याने गेल्या दोन दिवसात दीडशे रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ७२८ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचे अक्षरश: थैमान सुरू आहे. दिवसागणिक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतच असून, परिस्थिती आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा, अमळनेर, पारोळा, यावल आणि रावेरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाला रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर १५, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ६, अमळनेर ६, पाचोरा २, धरणगाव ४, यावल ३, एरंडोल ८, जामनेर ३, रावेर १०, पारोळा १०, चाळीसगाव १, बोदवड २ व इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण ७५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.