जळगाव - शहरासह जिल्ह्यात येत्या ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज (गुरुवार) जिल्ह्यातील रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी देत, कोरोना बाबतच्या सर्व अटी नियमांचे पालन करण्याची सक्ती व्यावसायिकांना केली आहे.
५० टक्के क्षमतेसंबंधित नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरासह जिल्ह्यात तब्बल १९० दिवसांनंतर रेस्टॉरंट तसेच बार सुरू होणार असल्याने रेस्टॉरंट, बार चालकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने गेल्या दोन महिन्यांपासून 'मिशन बिगीन अगेन' सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व सार्वजनिक सेवा सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. एस.टी सेवा अगोदर ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तर रेल्वेला केवळ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना परवानगी दिली होती. नंतर राज्यांतर्गत मोठ्या स्थानकावरून प्रवासी घेण्यास मान्यता दिली. आता मुंबईतील लोकल सुरू करण्यासह राज्यांतर्गत सर्व स्थानकावरून प्रवासी घेण्यास, सोबतच रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. शासनाच्या सूचना येताच जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात रेस्टॉरंट, बार हॉटेल्स सुरू करण्याबाबत आदेश काढला आहे.
५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, रेस्टॉरंटला परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. २६ मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. शहरात ८० ते ८५ नोंदणीकृत रेस्टॉरंट, हॉटेल्स आहेत. यांचे मोठे नुकसान लॉकडाऊनमुळे झाले आहे, अशी प्रतिक्रिया हॉटेल ॲण्ड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष लेखराज उपाध्याय यांनी दिली आहे.
९० कोटींची उलाढाल ठप्प :