जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या एका हॉटेलवर अज्ञात गुंडांनी हल्ला करत काही रोकड लुटून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या हॉटेल पंजाब खालसा याठिकाणी ही घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळनंतर या हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे जेवणासाठी ग्राहकांची गर्दी होती. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक काही गुंडांनी हॉटेलवर येऊन धुडगूस घातला. यावेळी गुंडानी हॉटेल मालकाला धमकावून शिवीगाळ केली. हॉटेलच्या वेटरला देखील शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर गुंडांनी हॉटेलमधील साहित्याची नासधूस करत गल्ल्यातून काही रोकड बळजबरीने हिसकावून घेतली.