जळगाव - लग्नासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील कुटुंबीयांच्या चारचाकीतून अडीच लाखांचे 5 तोळे दागिने व इतर वस्तू असलेली बॅग गहाळ झाली होती. ती बॅग परत करुन रामेश्वर कॉलनीतील चंदनसिंग मंगलसिंग चव्हाण व यश चंदनसिंग चव्हाण या बाप-लेकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. 12 डिसेंबर रोजी दुपारी घडलेल्या प्रकारानंतर दोघांनी बॅग एमआयडीसी पोलिसात आणून दिली. यानंतर पोलिसांनी संबंधितांना बोलावून बॅग सुरक्षित मुद्देमालासह स्वाधीन केली. दोघा बाप-लेकांच्या प्रामाणिपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
पाटील लग्नासाठी आले होते जळगावात-
मध्यप्रदेशातील हिरापूर येथील धर्मेंद्र महेश पाटील (वय 36) हे 10 डिसेंबर रोजी चुलत भावाच्या लग्नासाठी जळगावात आले होते. लग्न आटोपल्यावर काल 12 डिसेंबर रोजी धर्मेंद्र पाटील हे त्यांचे रामेश्वर कॉलनीतील नातेवाईकांच्या भेटीसाठी गेले. त्यांची भेट घेवून त्यांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये कपडे, दागिण्यासह इतर वस्तू असलेल्या बॅगा ठेवल्या. गावी परतण्यापूर्वी ते पुन्हा कस्तूरीमार्गे लग्न असलेल्या महालक्ष्मी दालमील येथे गेले. त्याठिकाणी दोन बॅगा ठेवत असतांना गाडीची डिक्की उघडी दिसली. यातील पाच तोळे, अडीच लाखांचे दागिणे व इतर साहित्य असलेली एक बॅग गहाळ झाल्याचे दिसून आले.
पोलिसांनी प्रामाणिकपणाचे केले कौतुक-
यानंतर धर्मेंद्र पाटील यांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी सापडलेली बॅग परत करण्यासाठी चंदनसिंग मंगलसिंग चव्हाण, व त्यांचा मुलगा यश चंदनसिंग चव्हाण हे दोघे त्याठीकाणी आले. यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल सुधीर साळवे, असीम तडवी, चेतन सोनवणे, किशोर पाटील होते.