जळगाव -सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र भक्तिमय आणि चैतन्याचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने आपल्या प्रेक्षकांसाठी जळगाव शहरातील प्रसिद्ध 'लाकडी गणपती'ची महती सांगणारा हा खास रिपोर्ट सादर केला आहे. जाणून घेऊया अनोख्या लाकडी गणपतीची सविस्तर माहिती...
हेही वाचा -डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती एकाच व्यासपीठावर असलेले पद्मालय तीर्थक्षेत्र! वाचा इतिहास...
जळगाव शहरातील बळीराम पेठेत तहसील कार्यालयाच्या आवारात लाकडी गणपतीचे मंदिर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या मंदिराला सुमारे 75 वर्षांपेक्षा अधिक काळाचा सुवर्ण इतिहास लाभला आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लाकडी गणपतीची सर्वत्र ख्याती असून, भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक गणेश चतुर्थीला याठिकाणी जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. नवस फेडण्यासाठी देखील याठिकाणी भाविकांची गर्दी होत असते. येथे येणारा प्रत्येक भाविक मोठ्या भक्तिभावाने गणरायाच्या चरणी नतमस्तक होत असतो.
- असे पडले 'लाकडी गणपती' हे नाव-
लाकडी गणपतीचा इतिहास अतिशय रंजक आहे. पूर्वी याठिकाणी भलेमोठे एक चिंचेचे झाड होते. झाडाच्या ढोलीचा आकार गणपतीच्या सोंडेप्रमाणे होता. झाडाच्या ढोलीत जणूकाही गणपतीची मूर्तीच विराजमान आहे, असा भास पाहणाऱ्याला व्हायचा. म्हणून अनेक जण याठिकाणी हात जोडून नमस्कार करायचे. पाहता पाहता याठिकाणी दररोज सकाळी व संध्याकाळी स्थानिक नागरिक दर्शनाला येऊ लागले. एखाद्या मंदिराप्रमाणे इथलं वातावरण प्रसन्न वाटायचे, म्हणून आबालवृद्ध दर्शन घेतल्यावर झाडाच्या आजूबाजूला बसायचे. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगायच्या. पुढे भाविकांची श्रद्धा वाढल्याने या ठिकाणी झाडाला चबुतरा बांधण्यात आला. मग लाकडी गणपती म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध झाले.
- श्रद्धा वाढली तशी भाविकांची गर्दीही वाढली-