जळगाव- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मंगळवारी दुपारी विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. सीबीआयने केलेली कारवाई अत्यंत चुकीची असून पुनाळेकर आणि भावे यांना त्वरित सोडण्यात यावे, अशी या संघटनांची प्रमुख मागणी होती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एका संशयिताने दिलेल्या जबाबावरून सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली आहे. हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. गेल्या तीन वर्षात सीबीआयने अनेक निरपराध हिंदूंना या प्रकरणात काहीच कारण नसताना संशयित म्हणून अटक केली आहे. वास्तविक पाहता संजीव पुनाळेकर यांनी अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय प्रकरणातील भ्रष्टाचार, राष्ट्र तसेच धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
याकूब मेमन, अफजल गुरू, कसाब यांच्यासारख्या दहशतवाद्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील दिले जातात. असे असताना संशयित म्हणून अटक झालेल्या हिंदूंची बाजू मांडण्यासाठी संजीव पुनाळेकर प्रयत्न करतात, त्यात काय चुकीचे आहे. सीबीआयने पुनाळेकर आणि भावे यांना अटक करणे म्हणजे हिंदूंच्या कर्तव्यावर घाला घालण्यासारखा प्रकार आहे. सीबीआयने केलेली कारवाई ही भारतीय संविधानाचा अपमान असल्याची भूमिका मांडत आंदोलकांनी पुनाळेकर आणि भावे यांच्या सुटकेची मागणी केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या -