जळगाव- प्रख्यात 'हिंदू' कादंबरीचा दुसरा भाग येत्या सहा महिन्यात वाचकांच्या हाती मिळेल, अशी माहिती हिंदू कादंबरीचे लेखक, साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना दिली.
प्रख्यात 'हिंदू' कादंबरीचा दुसरा भाग सहा महिन्यात वाचकांच्या हाती - भालचंद्र नेमाडे - प्रख्यात 'हिंदू' कादंबरीचा दुसरा भाग
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या हिंदू कादबंरीचा दुसरा भाग सहा महिन्यात वाचकांच्या हाती देणार असल्याची घोषणा भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे.
जळगावातील भवरलाल आणि कांताबाई मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे देण्यात येणारे कवयित्री बहिणाबाई पुरस्कार, बालकवी ठोंबरे पुरस्कार आणि ना. धों. महानोर पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची घोषणा नुकतीच भालचंद्र नेमाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
नेमाडे म्हणाले, हिंदू कादंबरी एकूण चार भागात येणार आहे. या कादंबरीच्या पहिल्या भागाचे लिखाण दहा वर्षांपूर्वी शिमला येथे झाले होते. आता हिंदूच्या दुसऱ्या भागाचे लिखाण आपण जळगावात करणार आहोत. कारण जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांना आपण तसे वचन दिले होते. मी हिंदू कादंबरीचे चार भाग आराखड्यात ठेवले आहेत. आता दुसऱ्या भागाचे लेखन मी जळगावात करणार आहे. त्यासाठी सर्व लेखन साहित्य मी सोबत आणले आहे. मी एकदा लिहायला बसलो की लवकर उठत नाही. त्यामुळे येत्या सहा महिन्यात हिंदूचा दुसरा भाग पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचेही यावेळी नेमाडे यांनी सांगितले.