जळगाव- समाजातील विभिन्न घटक एकत्र यावेत, या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळापासून गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली होती. आजही ती प्रथा जिल्ह्यात कायम आहे. गेल्या ५० वर्षांपासून जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणूक निघते. यंदाही मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली. यावेळी मुस्लीम बांधवांकडून मानाच्या गणपतीचे पूजन झाले. तर हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्रितपणे लालशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढविली.
हिंदू व मुस्लीम बांधवांना एकत्र आणण्यासाठी नियाज अली यांनी १९७० सालापासून ही परंपरा सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. नियाज अली यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अयाज अली हे या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळतात. जळगाव महापालिकेचा गणपती हा मानाचा गणपती मानला जातो. मिरवणुकीवेळी हा गणपती भिलपुरा चौकात आल्यानंतर त्याठिकाणी नियाज अली फाउंडेशनच्या वतीने मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात येते व गणरायाची पूजा केली जाते. त्यानंतर हिंदू व मुस्लीम बांधव एकत्रितपणे लालशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवतात.