जळगाव- सध्या राज्यात उष्ण लहरी वाढल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारादेखील यामुळे सरासरी ४७ अंशांवर पोहचला आहे. मात्र, तीन ते चार ठिकाणी तापमान मोजले जात असल्याने त्यात येणाऱ्या तापमानातील चढ-उतारामुळे जळगावचे नेमके तापमान तरी किती ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. प्रशासनाने एकाच ठिकाणी अचूक तापमान मोजणारी यंत्रणा बसवावी, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
विदर्भानंतर राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होणाऱ्या जळगाव जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या ठिकाणाहून तापमानाची नोंद घेतली जाते. सरकारी कार्यालये, महाविद्यालये तसेच काही खासगी कंपन्यांनी त्यांच्या आवारात बसवलेल्या तापमापक केंद्रांवरून तापमानाची नोंद घेण्यात येते. त्यात मात्र, तापमानाची नोंद घेताना किमान दोन डिग्रीचा फरक दिसतो. यामुळे जळगावचे नेमके तापमान किती, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे. सोनं, केळी, कापूस यासोबतच तापमानामुळे जळगावची आणखी एक वेगळी ओळख निर्माण झाली असताना शहराच्या तापमानातील तफावतीवर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.