जळगाव - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाची रेल्वेस्थानके आणि विमानतळांची सुरक्षा वाढवण्यात आली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातही 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. साध्या वेशातील आरपीएफ जवान स्थानकांसह आऊटरवर गस्त घालत आहेत.
कलम ३७० हटवल्यानंतर रेल्वेच्या भुसावळ विभागात हायअलर्ट - high alert on railway
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाची रेल्वेस्थानके आणि विमानतळांची सुरक्षा वाढवण्यात आली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातही 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ आयुक्त अजय दुबे, सहायक आयुक्त राजेश दीक्षित यांनी भुसावळ जंक्शनच्या सुरक्षेचा नुकताच आढावा घेतला. त्यानंतर भुसावळ विभागातील महत्त्वाच्या सर्व स्थानकांवरील आरपीएफची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावरील आरपीएफ निरीक्षकांना सुरक्षा यंत्रणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर आरपीएफ जवानांनी गस्त घालावी, संशयित आढळल्यास आरपीएफ ठाण्यात नेऊन त्याची कसून चाैकशी करावी, त्याच्याजवळील साहित्याची तपासणी करावी, त्याच्याकडील रेल्वे तिकीट आदी बाबींची नोंद घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कलम ३७० रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ जंक्शनवरदेखील मुसाफीर खाना, प्रतीक्षालयात कसून तपासणी केली जात आहे. तसेच रेल्वेगाडी स्थानकावर आल्यानंतर जनरल ते एसीच्या डब्यापर्यंत श्वान पथक तपासणी करत आहे. भुसावळ विभागातून मुंबई, पुणे, सूरत, नागपूर आणि खंडव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये आरपीएफची गस्त वाढवण्यात आली आहे. गणवेशातील जवानांसाेबतच साध्या वेशातील जवान धावत्या गाड्यांमध्ये गस्तीवर आहेत.