जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या पिंप्री बुद्रुक गावाला सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे अबाल-वृद्धांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दुष्काळामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने पिंप्री बुद्रुकच्या ग्रामस्थांवर दररोज पाणी विकत घेण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
पिंप्री बुद्रुकला तीव्र पाणीटंचाई; दररोज पाणी विकत घेण्याची दुर्दैवी वेळ - jalgaon news
ग्रामपंचायतीकडून 5 ते 6 दिवसाआड पाणीपुरवठा होतो, पण तो पुरेशा प्रमाणात होत नाही. शेतशिवारातील विहिरींना पाणी नाही. ज्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे, ते दुसऱ्यांना पाणी भरू देत नाहीत. अशा परिस्थितीत विकतचे पाणी घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही.
सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या पिंप्री बुद्रुक गावाला गेल्या 5 ते 6 वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला नियमित पाणीपुरवठा होऊ शकेल, असा शाश्वत नैसर्गिक जलस्त्रोत तसेच शासनाच्या वतीने सक्षम पाणीपुरवठा योजना राबवण्यात आलेली नसल्याने पाणीबाणी पिंप्रीकरांच्या पाचवीला पुजलेली आहे. दिवस उगवला की लहान मुले, महिला तसेच घरातील कर्त्या पुरुषांना कामधंदा सोडून हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ग्रामपंचायतीकडून 5 ते 6 दिवसाआड पाणीपुरवठा होतो, पण तो पुरेशा प्रमाणात होत नाही. शेतशिवारातील विहिरींना पाणी नाही. ज्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे, ते दुसऱ्यांना पाणी भरू देत नाहीत. अशा परिस्थितीत विकतचे पाणी घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही. सध्या प्रत्येक घरात पिण्यासाठी 20 रुपये प्रतिलिटर जारचे तर वापरासाठी 700 रुपये टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. हा खर्च परवडणारा नसला तरीही नाईलाजाने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकसहभागातून गावात ठिकठिकाणी 10 ते 12 हातपंप, 5 ते 6 कूपनलिका करण्यात आल्या, पण त्यांना पाणी लागले नाही. ग्रामपंचायतीने 4 विहिरी खोदूनही उपयोग झाला नाही. सद्यस्थितीत शेजारच्या पिंपळकोठा गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीतून ग्रामपंचायतीने पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे किमान 5 ते 6 दिवसाआड थोड्याफार प्रमाणात पाणी मिळत असले तरी ते पुरेसे नाही. जूनचा पहिला आठवडा उलटला तरी पावसाची चिन्हे नाहीत. पाऊस अजून लांबला तर पिंप्रीचा पाणीप्रश्न अजून बिकट होईल.
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर गंभीर आहे. शेतकरी आपली जनावरे पाणी पाजण्यासाठी शेजारील चिंचपुरा, वराड, मुसळी शिवारातील विहिरींवर घेऊन जातात. प्रशासनाने किमान जनावरांसाठी तरी टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी पिंप्रीच्या ग्रामस्थांची मागणी आहे.