जळगाव -जिल्ह्यातील जामनेर तालुक्याला सोमवारी (6 सप्टेंबर) रात्री वादळ-वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. आज (मंगळवारी) सकाळपासून देखील पाऊस सुरूच असून, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवरची पत्रे उडून गेली तर काही घरांची पडझड झाली आहे. रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, कांग नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेला आहे.
17 गावांमध्ये झाली मोठी हानी -
जामनेर तालुक्यातील 17 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जामनेर तालुक्यातील हिंगणे गावातील सुमारे 20 घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ओखर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी 40 घरांची पत्रे उडाली आहेत. रामपूर येथे 10 तर लहासर येथे 15 घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ढालशिंगी येथे 4 घरांची अंशत: पडझड झाली असून, जुनोने येथे एका घराची भिंत कोसळली आहे. तळेगाव आणि पहूर येथे अनुक्रमे 9 आणि 8 दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. टाकळी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाची पत्रे उडाली आहेत. या सर्व गावांमध्ये सुमारे 130 घरांची पत्रे उडाली आहेत. यासोबतच मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी आणि या गावांच्या शिवारातील पिकांचे वादळ आणि मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील भागदरा, तळेगाव, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
उंबर, कांग नद्यांना पूर -
जामनेर तालुक्यातील उंबर आणि कांग नदीला मोठ्या पूर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे भागदरा गावामधील अनेक घरांवरील पत्रे उडाली असून, उंबर नदीचे पाणी भागदरा गावात शिरले आहे. गावाजवळ असलेला पाझर तलाव देखील फुटल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रस्ते देखील वाहून गेले आहे. त्यामुळे गावातील काही भागाचा संपर्क तुटला आहे.
हेही वाचा -जळगाव जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; नद्या, नाल्यांना पूर... पाहा व्हिडिओ