जळगाव -जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे वाघूर, बोरी या नद्यांसह अनेक ठिकाणी नाल्यांना पूर आले. दरम्यान, मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील पेरणीला आता वेग येणार आहे. जळगाव जिल्ह्यात यावर्षी मान्सूनच्या पावसाचे वेळेवर आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस, 'हतनूर' धरणाचे 16 दरवाजे अर्धा मीटरने उघडले - हतनूर धरण न्यूज
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने वाघूर, बोरी या नद्यांसह अनेक ठिकाणी नाल्यांना पूर आले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील पेरणीला आता वेग येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी ढगांची गर्दी होऊन वादळ-वारा वाहत होता. जिल्ह्यातील रावेर, यावल, भुसावळ, जामनेर तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागात रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर जळगाव शहर, धरणगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव येथेही दमदार पाऊस पडला. अमळनेर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. दमदार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. जळगाव शहरात देखील रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वादळामुळे शहरातील अनेक भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
हतनूर धरणातून 416 क्यूमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू-
भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मंगळवारी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस पडला. रात्री झालेल्या पावसामुळे आज (बुधवारी) सकाळी 7 वाजता धरणाचे 16 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, धरणातून 416 क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.