जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. वादळाचा जोर जास्त असल्याने अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाले आहेत. तर काही ठिकाणी मातीच्या कच्च्या घरांची पडझड देखील झाली आहे.
रावेर तालुक्यातील सावखेडा, खिरोदा, चिनावल, विवरा परिसरात गुरुवारी दुपारी अचानक ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस पडत होता. वादळामुळे घरे, गुरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाले. तर पावसामुळे शेतांमध्ये असलेल्या जनावरांच्या कडब्याचे मोठे नुकसान झाले. सावखेडा गावात वादळाचा जोर अधिक होता. याठिकाणी वादळामुळे विजेचे खांबदेखील कोसळले. विजेच्या तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.