महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळी पावसाचा तडाखा...! जळगाव जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान - जळगाव जिल्ह्यातील बातम्या

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. यावल, रावेर तसेच चोपडा तालुक्यात तर वादळी पावसाचा तडाखा बसला. वादळ आणि मुसळधार पावसामुळे केळी बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तीनही तालुके मिळून सुमारे 600 ते 650 हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

Heavy rain destroys banana crop in jalgaon amid Covid lockdown
वादळी पावसाचा तडाखा...! जळगाव जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान

By

Published : Jun 18, 2020, 11:48 AM IST

जळगाव- गेल्या पंधरवड्यात दोन वेळा झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील यावल, रावेर तसेच चोपडा तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळात कापणीवर आलेली केळी जमीनदोस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कृषी आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. यावल, रावेर तसेच चोपडा तालुक्यात तर वादळी पावसाचा तडाखा बसला. वादळ आणि मुसळधार पावसामुळे केळी बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तीनही तालुके मिळून सुमारे 600 ते 650 हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. कापणीवर आलेली केळी जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात देखील या तीनही तालुक्यांमध्ये वादळी पाऊस झाला होता. तेव्हाही केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच दोन दिवसांपूर्वी पुन्हा वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

वादळी पावसामुळे जमीनदोस्त झालेली केळीची बाग...
वादळी पावसामुळे रावेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यातील सुमारे 35 ते 40 गावांमधील केळी बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. अहिरवाडी, मोरगाव, तांदलवाडी, विवरे बुद्रुक, केऱ्हाळा खुर्द, पिंप्री, वाघोद, निंभोरा सिम, पुनखेडासह अनेक गावांमधील साडेतीनशे ते चारशे हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यातील अनेक गावांना देखील वादळी पावसाचा फटका बसला आहे. चोपडा तालुक्यातील माचला, अडावद, विदगाव, धानोरा परिसराला तडाखा बसला आहे. जळगाव तालुक्यातील खेडी, भोकर, किनोद परिसरात केळी बागांचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी बोलताना...

माचला येथील शेतकऱ्याचे 25 ते 30 लाखांचे नुकसान-
दोन दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यातील माचला शिवारात झालेल्या वादळी पावसामुळे माचला येथील शेतकरी प्रताप भीमराव निकम यांच्या शेतातील 5 हेक्टरवरील केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या बागेत 20 ते 22 हजार केळीची खोडे होती. त्याचप्रमाणे पपई बागही उद्ध्वस्त झाली आहे. पपईच्या बागेत 5 हजार झाडे होती. ती सर्व जमीनदोस्त झाली आहेत. कापणीवर आलेली केळी तसेच पपईची बाग उद्ध्वस्त झाल्याने प्रताप निकम यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी शेतीसाठी कॉर्पोरेशन बँकेकडून 70 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. बँकेने पीकविमा देखील काढला नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत ते सापडले आहेत. दरम्यान, माचला शिवारात झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने केले आहेत. त्यात प्रताप निकम यांचे 20 ते 22 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, तशी दप्तरी नोंद केली आहे. नुकसानीपोटी आपल्याला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी निकम यांनी केली आहे.

हेही वाचा -जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस, 'हतनूर' धरणाचे 16 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

हेही वाचा -विषप्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या; जळगाव जिल्ह्यातील गोराडखेडा येथील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details