जळगाव - कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील सुमारे 90 टक्के कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोना योद्धे असलेले कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हेही वाचा -जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 54 हजार 812 रुग्ण कोरोनामुक्त
शासनाला जेव्हा गरज होती, तेव्हा आमची मदत घेतली. मात्र, गरज संपली आणि आमचे काम थांबवण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असतानाही आम्ही जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा बजावली. त्यामुळे, आमच्या बाबतीत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आणि ग्रामीण स्तरावर कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले होते. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये मानधन तत्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता सगळीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जे कोविड सेंटर्स सुरू आहेत, तेथील कर्मचाऱ्यांचे पगारही नियमितपणे वेळेवर होत नाहीत. शासनाच्या अशा कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात उभारले होते 92 कोविड सेंटर्स -
जळगाव जिल्ह्यात एप्रिल 2019 नंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. त्यानंतर मे महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचा संसर्ग अधिक होता. या काळात खबरदारी म्हणून तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आणि ग्रामीण स्तरावर 92 कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यातील 26 कोविड सेंटर्स प्रत्यक्षात वापरात होते. या प्रत्येक सेंटरवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 250 ते 300 कंत्राटी आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, नंतरच्या काळात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत गेला, त्यामुळे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील कोविड सेंटर्स बंद करण्यात आले.