जळगाव -महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई करत प्रतिबंधित क्षेत्रात लावलेल्या दुकानाचा माल जप्त केला. त्याचा राग आल्याने एका हॉकरने अतिक्रमण विभागाचे ट्रॅक्टर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. शहरातील फुले मार्केटमध्ये शुक्रवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. या हॉकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वेळीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला.
गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिकेचे नो हॉकर्स झोन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठेत ठिकठिकाणी नो हॉकर्स झोन तयार केला आहे. मात्र, याच भागात व्यवसाय होत असल्याने हॉकर्स आपली दुकाने प्रतिबंधित क्षेत्रात थाटत आहेत. शुक्रवारी फुले मार्केटमध्ये अनेक हॉकर्सने दुकाने थाटायला सुरुवात केली होती. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक दाखल झाल्यामुळे हॉकर्सची पळापळ झाली. काही हॉकर्सचा माल जप्तही करण्यात आला.