जळगाव - सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी रविवारी पहाटे सुमारे 3 हजार जळगावकर रनर्स तिसऱ्या हाफ मॅरेथॉन 'खान्देश रन' स्पर्धेत धावले. जिल्ह्यात हाफ मॅरेथॉन प्रकारातील ही पहिलीच स्पर्धा असून 21 किमी हाफ मॅरेथॉन, 10 किमी रेस, 5 किमी रेस तसेच 3 किमी रेस अशा 4 प्रकारात तीचे आयोजन करण्यात आले होते.
जळगावात रविवारी तिसऱ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर हे या 'खान्देश रन' स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या स्पर्धेत विविध वयोगटातील मुले-मुली, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. रन दरम्यान, प्रत्येक स्पर्धकाला रनिंग आणि फिटनेसचे महत्त्व मनोरंजनातून समजविण्यासाठी कार्टून्सची पात्र असलेल्या मोटू व पतलूचे चित्र असलेले झेंडे मार्गावर लावण्यात आले होते. यावेळी जागोजागी पुष्पवृष्टी करत रनर्सचे स्वागत करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधांसह रनर्सला चिअरअप करण्यासाठी खेळाडू, विविध शालेय बँड पथक, लेझीम व ढोल-ताशे पथक देखील वातावरण निर्मितीसाठी आकर्षण ठरले.