जळगाव -मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीची कारवाई संशयास्पद आहे, असा दावा जळगावातील इथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला आहे. ड्रग्ज प्रकरणात समोर आलेल्या चॅट प्रकरणात मॉडिफिकेशनचा उल्लेख आला आहे. याशिवाय उच्च न्यायालयात आर्यन खानच्या विरोधात एनसीबीने केलेल्या युक्तिवादात चॅटसंदर्भात काही गोष्टी आल्या आहेत. त्यामुळे हा कुठेतरी फॅब्रिकेटेड विषय असून, एनसीबीची कारवाई संशयास्पद आहे, असे हॅकर मनीष भंगाळे याचे म्हणणे आहे.
हॅकर मनीष भंगाळेंची प्रतिक्रिया 5 लाखांची ऑफर देणारे सॅम डिसुझाच्या बाजूचे?
6 ऑक्टोबर रोजी रात्री जळगावात आपल्याला अलोक जैन आणि शैलेश चौधरी नामक दोन व्यक्ती भेटले होते. त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी आपल्याला 5 लाखांची ऑफर केली होती. मला भेटायला आलेले हे दोघे जण सॅम डिसुझाच्या बाजूच्या असू शकतात, असा दावाही मनीष भंगाळेने केला आहे.
'चौकशी मागणी मात्र, अजून कुणीही अप्रोच नाही'
या सगळ्या प्रकरणाबाबत संशय आल्याने आपण मुंबई पोलीस आयुक्तांसह गृह मंत्रालयाला चौकशीचे पत्र दिले आहे. परंतु, अद्याप मला कुणीही अप्रोच झालेले नाही. आता मी माझ्या पत्राचे स्टेटस चेक करणार असल्याची माहितीही मनीष भंगाळेने दिली आहे.
खडसेंबाबत केलेल्या 'त्या' दाव्याबाबत भंगाळे आजही ठाम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याच्या दाव्यावर मनीष भंगाळे आजही ठाम आहे. 'हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावर अधिक बोलणे उचित होणार नाही. खडसेंच्या संभाषणाच्या बाबतीत माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही. पण मी न्यायालयात तांत्रिक पुरावे सादर केले आहेत', अशी माहिती मनीष भंगाळे याने दिली. या प्रकरणात दावा केल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल होऊन कारावास झाला. पण आता तक्रारदार फरार आहे, न्यायालयात मी माझी बाजू मांडली आहे, असेही त्याने सांगितले.
'नॅशनल इंटरेस्टसाठी जे काही करता येईल ते मी करतो'
एकनाथ खडसेंचे दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्यानंतर मी गायब झालेलो नव्हतो. मागच्याच वर्षी मी जळगावातील 420 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात तपासकामी पोलिसांना मदत केली. आता ड्रग्ज प्रकरणात मला संशय आल्याने मी लागलीच मुंबई पोलीस आयुक्तांना आणि गृह मंत्रालयाला पत्र लिहून चौकशीची मागणी केली. नॅशनल इंटरेस्टसाठी जे काही करता येईल ते मी करतो, असेही मनीष भंगाळे याने म्हटले आहे.
हेही वाचा -शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा सीडीआर काढण्यासाठी पाच लाखांची ऑफर; क्रूझ ड्रग्स प्रकरणी हॅकरचा दावा