जळगाव -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान वरणगाव पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई झाली. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सुमारे 15 लाख रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात चारचाकी चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीचा चालक रियाज अली लियाकत अली, सिकंदरकुमार साहनी तसेच गुटख्याचा मालक गणेश चव्हाण अशी संशयित आरोपींची नावे आहेत. हे तिघेही जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील रहिवासी आहेत.
गाडी जप्त करून संशयितांना अटक -
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे, अशा परिस्थितीत वरणगाव शहरात बस स्थानकाच्या जवळ पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीसाठी नाकाबंदी पॉईंट उभारण्यात आला आहे. शनिवारी दुपारी पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एक मालवाहू चारचाकी त्याठिकाणी आली. गाडीत काय आहे म्हणून पोलिसांनी विचारणा केली असता, चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने गाडीची तपासणी करण्यात आली. त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला व विमल सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी गाडी जप्त करून संशयितांना अटक केली.