जळगाव - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भाजपाने 1 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चाची हाक दिली आहे. याच मुद्द्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (शुक्रवारी) भाजपाला जोरदार चिमटा काढला. 'कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाला विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावता आलेली नाही. त्यामुळे आता भाजपाने प्रॅक्टिस म्हणून मोर्चा काढायलाच हवा. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी त्यांनी हा मोर्चा योग्य नियोजनात काढावा', अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आढावा बैठकीतील मुद्दे, भाजपाचा प्रस्तावित मोर्चा, जिल्हा बँक निवडणूक अशा विषयांवर मते मांडली.
भाजपाने प्रॅक्टिस तर करायलाच हवी ना?
भाजपाच्या मोर्चाबद्दल बोलताना मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, भाजपा शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या नावाने मोर्चा काढत आहे. पण त्या मोर्चाची फलश्रुती काय आहे? कारण ज्या कारणांसाठी ते मोर्चा काढत आहेत, त्या मागण्या राज्य सरकारने आधीच पूर्ण केल्या आहेत. भाजपाने मोर्चा जरूर काढायला हवा. कारण त्याशिवाय त्यांना बरे वाटणार नाही. बऱ्याच दिवसांपासून कोरोनामुळे ते शांत होते. त्यांनी मोर्चा काढायची प्रॅक्टिस करायलाच हवी. त्यांचा मोर्चा हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी असेल, असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला लगावला.