जळगाव- मराठवाड्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने 'मराठवाडा ग्रीड' नावाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील पाणीप्रश्न 100 टक्के निकाली निघणार आहे. परंतु, ही योजना पूर्ण होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. 1 किंवा 2 महिन्यात जादूने काही होईल, असे नाही. त्यामुळे बहीण म्हणून मी पंकजा मुंडेंना विनंती करतो. त्यांनी 6 महिने सरकारला वेळ द्यावा, अशी विनंती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. गुलाबराव पाटील सोमवारी जळगावात होते.
'बहीण म्हणून विनंती करतो, पंकजा मुंडेंनी 6 महिने सरकारला वेळ द्यावा' - Pankja Munde news
बहीण म्हणून मी पंकजा मुंडेंना विनंती करतो. त्यांनी 6 महिने सरकारला वेळ द्यावा, अशी विनंती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. गुलाबराव पाटील सोमवारी जळगावात होते.
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप नेत्या तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या विषयासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील बोलत होते.
पुढे पाटील म्हणाले, लोकशाहीत आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी ज्या मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. 'मराठवाडा ग्रीड' नावाची 24 हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना आम्ही आखली आहे. योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही दिवसात निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम सुरू होईल. परंतु, ही सारी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. हे पंकजा मुंडे यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्या देखील एक जबाबदार आमदार आणि मंत्री होत्या. त्यांनी आमच्या सरकारला काही वेळ देणे गरजेचे आहे. जर या योजनेचे काम सुरूच झाले नाही तर मात्र, त्यांना निश्चितच आंदोलन करण्याचा अधिकार असेल, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.