महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना उपनेते गुलाबराव पाटलांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी - गुलाबराव पाटील बातमी

जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघ म्हटला की शिवसेनेचे माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची नावे डोळ्यासमोर येतात. गेल्या दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघाचे राजकारण या दोन्ही नेत्यांभोवतीच फिरत राहिले आहे.

gulabrao-patil-will-taking-oaths-as-a-minister
गुलाबराव पाटील

By

Published : Dec 30, 2019, 2:03 PM IST

जळगाव- शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांची उद्धव ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. युती सरकारच्या कार्यकाळात सहकार राज्यमंत्री असलेले गुलाबराव पाटील आता कॅबिनेट मंत्री असणार आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेले गुलाबराव पाटील हे आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे 'खान्देशाची मुलुख मैदान तोफ' म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्या मंत्रीपदामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा-औरंगाबादला दोन मंत्रिपदे; अब्दुल सत्तार अन् संदीपान भुमरेंची वर्णी

जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघ म्हटला की शिवसेनेचे माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची नावे डोळ्यासमोर येतात. गेल्या दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघाचे राजकारण या दोन्ही नेत्यांभोवतीच फिरत राहिले आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव व धरणगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. मागील दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघाला राज्यमंत्रीपद मिळत आहे. सन २००९ मध्ये गुलाबराव पाटील यांना पराभूतकरुन प्रथमच गुलाबराव देवकर विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासह परिवहन राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले होते. मात्र, मंत्रिपदी कार्यरत असतानाच तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात देवकर यांना तुरुंगात जावे लागले होते. विरोधकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरल्याने गुलाबराव देवकर यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर सन २०१४ ची विधानसभा निवडणूक देवकरांना तुरुंगातून लढवावी लागली. त्यावेळी गुलाबराव पाटलांनी देवकरांना पराभूत केले होते. त्यावेळी देखील गुलाबराव पाटलांच्या रुपाने जळगाव ग्रामीण मतदारसंघाला मंत्रिपद मिळाले. भाजपसोबत शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने गुलाबराव पाटलांना तेव्हा सहकार राज्यमंत्री पद मिळाले. देवकरांना शह देण्यात यशस्वी झालेल्या गुलाबराव पाटलांनी युती सरकारच्या पाच वर्षांच्या काळात विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघावर आपली पकड निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यानंतर आताच्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा महाजन यांच्यासह भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांचे आव्हान मोडून काढत आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. तेव्हाच गुलाबराव पाटलांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळेल. हे जवळपास निश्चित झाले होते. फक्त त्यांच्यावर कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात येते, ही औपचारिकता होती.

जळगावचे पालकमंत्री पदही मिळणार?

मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून राजकीय पटलावर उदयास आल्यानंतर माजीमंत्री गिरीश महाजन हे राज्यभर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यात यशस्वी ठरले होते. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापेक्षा वरचढ ठरण्यात देखील ते काही अंशी यशस्वी झाले होते. दुसरीकडे, गिरीश महाजन यांनी सेनेला दाबण्याचा सतत प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत सेनेच्या वाट्याला असलेल्या जिल्ह्यातील चारही मतदारसंघात बंडखोर उभे करण्यामागे त्यांचाच हात असल्याची शिवसैनिकांची भावना होती. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्यावर नाराज होते. भाजपला 'जशास तसे' उत्तर देण्यासाठी आता जळगावचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या मंत्र्याला मिळावे. विशेषत: गुलाबराव पाटील यांच्याकडे ते द्यावे, अशी भावना जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना हे पालकमंत्री पद मिळाणार असल्याचेही जवळपास निश्चित आहे.

गुलाबराव पाटील यांचा परिचय- जन्म तारीख- ५ जून १९६७, मुळ गाव- लाडली, ता. धरणगाव, जन्म गाव व हल्ली राहत असलेले गाव- पाळधी, ता. धरणगाव, जिल्हा जळगांव, शिक्षण - इयत्ता १२ वी (कला ), इयत्ता १ ली ते ४ थी- जि. प. प्राथमिक शाळा (मुलांची ) पाळधी ता. धरणगाव, इयत्ता ५ वी ते १० वी- स. न. झवर, माध्यमिक विद्यालय, पाळधी ता. धरणगाव, इयत्ता ११ वी ते १२ वी - नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव, छंद व आवड- गायन, क्रिकेट खेळणे, नाटकात अभिनय करणे.



नेतृत्त्व- गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व कणखर स्वभावाचे असून व्यासपिठावरच्या त्यांच्या दमदार पहाडी आवाजाच्या भाषण शैलीमुळे त्यांना महाराष्ट्रात खान्देशाची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाते.

राजकीय क्षेत्रातील प्रवेश-
वयाच्या २५ व्या वर्षी पाळधी येथे शिवसेनेची शाखा सुरू केली. शाखा प्रमुख म्हणून ते स्वतःच होते. १९९१ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चाळीसगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये तत्कालीन जिल्हाप्रमुख गणेश राणा यांनी त्यांना भाषणाची संधी दिली. तेथे त्यांचे भाषण खूपच प्रभावी झाले. तेथूनच खरा राजकीय प्रवास सुरु झाला. १९९२ मध्ये ते एरंडोल पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. याच काळात धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवड झाली. १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम केले. १९९७ मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती पदावर निवड झाली. १९९७ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या म्हाडाच्या समितीवर सदस्यपदावर निवड. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या पक्षावर एरंडोल विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्याच पंचवार्षिकमध्ये ते शिवसेनेचे नाशिक विभागाचे प्रतोद होते. १९९९ ते २००४ व २००४ ते २००९ या दोन पंचवार्षिक निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. २०१० मध्ये शिवसेना पक्षाचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. आजपर्यंत ते उपनेते म्हणून कार्यरत आहेत. २०१४ च्या पंचवार्षिक निवडणूकीत ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. आता २०१९ मध्ये ते चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details