महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'किरीट सोमैया यांच्या डोक्यावर कायमस्वरुपी परिणाम झाला आहे' - Gulabrao Patil slammed kirit somaiya

भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाईक कुटुंबीयांशी जमीन व्यवहार असल्याचा आरोप केला. या आरोपाला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

By

Published : Nov 13, 2020, 3:56 PM IST

Updated : Nov 13, 2020, 4:03 PM IST

जळगाव -भाजप नेते किरीट सोमैया यांच्या डोक्यावर कायमस्वरुपी परिणाम झाला आहे. म्हणून ते सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांना ठाण्यातील मनोरुग्णांच्या रुग्णालयात दाखवले पाहिजे. त्याठिकाणी शॉक दिल्यानंतर त्यांची ही बेताल वक्तव्ये थांबतील, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमैया यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

जळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी दुपारी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' लघुपटाचे प्रसारण आणि कोविड योद्धांचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी किरीट सोमैया यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.

किरीट सोमैया यांच्या डोक्यावर कायमस्वरुपी परिणाम

सोमैयांनी आपली औकात बघावी-

किरीट सोमैया यांची शिवसेनेवर टीका करण्याची लायकी नाही. उद्धव ठाकरेंच्या पायाशी बसून ते खासदार झाले. आता ते त्यांच्यावर टीका करतात. किरीट सोमैया हा माणूस 'एहसान फरामोश' (कृतघ्न) आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी आपली औकात बघावी, अशी शब्दात सोमैयांवर पाटील यांनी कठोर टीका केली आहे.

किरीट सोमैयांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका-

भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाईक कुटुंबीयांशी जमीन व्यवहार असल्याचा आरोप केला. यानंतर अद्याप उद्धव ठाकरेंनी कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. शिवसेनेच्या कोणत्याही प्रवक्त्यात दम असेल तर मला उत्तर द्या, असे आव्हान सोमैया यांनी दिले आहे. मुरुड येथील जमिनीबाबत विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे द्या, असेही सोमैया यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. अन्वय नाईक परिवार आणि तुमचे काय संबंध आहेत, हे जनतेला ऐकायचे आहे, अशा प्रकारे सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबईच्या महापौरांनीही सोमैयांवर केली टीका

शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या महापौरांवर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी तोफ डागली आहे. याला प्रत्युत्तर देताना महाभारतात जसे शिखंडीच्या मागून लढाई केली जात होती. तशीच भाजप करत असून सोमय्या हे शिखंडीची भूमिका बजावून आरोप करत आहेत. अशी तिखट प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे

Last Updated : Nov 13, 2020, 4:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details