जळगाव -गेल्या काही दिवसांत जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सव्वादोनशेवर गेला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा अचानक वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या स्थलांतरित नागरिकांमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे, असे मत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
'परजिल्ह्यातून येणाऱ्या स्थलांतरित नागरिकांमुळे कोरोना संसर्गाचा धोका'
सध्या जळगाव जिल्ह्यातदेखील बाहेरून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित नागरिक येत आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी गुलाबराव पाटील यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी गुलाबराव पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारने विविध महानगरांमध्ये अडकून पडलेले कामगार तसेच मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे देशभर सर्वत्र स्थलांतरित आपापल्या घरी परतत आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यातदेखील बाहेरून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित नागरिक येत आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी गुलाबराव पाटील यांनी केले.
अन्नछत्र चालवणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी -
जळगाव शहरालगत काही स्वयंसेवी संस्था या बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोकांना जेवणाचे वाटप करत आहेत, अशा स्वयंसेवी संस्थांना आम्ही गावाबाहेर अन्नछत्र लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. याठिकाणी विशेष काळजी घेतली जावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. जिथे जेवण दिले जाते तिथे एक ते दीड तास वाहने थांबतात. शिवाय स्थलांतरित नागरिकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने संसर्गाचा धोका वाढतो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांशी उपाययोजनांबाबत चर्चा -
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी कोरोनाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. 30 बेडचे आयसीयू 100 बेडचे करणार, शाहू महाराज रुग्णालय कोविड रुग्णालय होऊ शकते का? कोरोना रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी काय करावे, मोहाडी येथील महिला रुग्णालयाचा वापर कोविडसाठी होऊ शकतो का? याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.