जळगाव -पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. सर्व सिंचन प्रकल्पांबाबत माहिती घेण्यासाठी लवकरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात येईल. त्यानंतर सरकारकडे पाठपुरावा करून प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात प्रयत्न असतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शनिवारी सायंकाळी अजिंठा विश्रामगृहात जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पहिलीच पक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात पाडळसे येथील निम्न तापी सिंचन प्रकल्प, शेळगाव बॅरेज प्रकल्पासह 7 बलून बंधारे प्रकल्प रखडलेले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाले तर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे? कोणत्या प्रकल्पाला किती निधीची आवश्यकता आहे? याशिवाय कोणत्या प्रकल्पाला काय अडचणी आहेत? ही माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
पाणी योजनांची स्थितीही जाणून घेऊ -