जळगाव -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून गेले असून, त्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे. तत्पूर्वी या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात ठाकरे कुटुंबीयांविषयीच्या आठवणींना उजाळा देताना भावनिक प्रतिक्रिया दिली. 'आज आमचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारकीची शपथ घेणार असून आम्हा शिवसैनिकांसाठी हा सुवर्ण दिवस आहे. पण दुःख एकाच गोष्टीचे आहे की आज शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. आजचा सुवर्ण दिवस पाहण्यासाठी 'बाळासाहेब' हवे होते', अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
आजचा सुवर्ण दिवस पाहण्यासाठी 'बाळासाहेब' हवे होते- गुलाबराव पाटील
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाला भेट देत आढावा बैठक घेतली.
जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुलाबराव पाटील आज दुपारी जिल्हा रुग्णालयात आलेले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांची तिसरी पिढी आम्ही पाहतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे असतील, त्यांच्यापैकी कुणीही आतापर्यंत प्रत्यक्ष निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमच्यासारख्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन मंत्री बनवले. आज उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर निवडून गेले असून, आमदारकीची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस आहे. आज बाळासाहेब ठाकरे हवे होते, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
येत्या 8 दिवसात जळगावात प्रयोगशाळा कार्यान्वित होणार-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जळगाव जिल्हा रुग्णालयात सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणीला मंजुरी दिली आहे. त्यानंतर तातडीने हालचाली होऊन प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत हे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 8 दिवसात जळगावात प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जळगावातच कोरोनाच्या चाचण्या होणार आहेत. दरम्यान, प्रातिनिधिक तत्त्वावर याठिकाणी कोरोनाच्या चाचण्या होत असून लवकरच ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे एकाच दिवसात जास्तीत जास्त चाचण्या करता येणार असून, अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.