जळगाव -गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमाप्रश्न 'जैसे थे' आहे. याठिकाणी 65 वर्षांपासून मराठी माणसांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. त्यामुळे आम्ही केंद्रातील भाजपा सरकारचा काळ्या फिती लावून निषेध नोंदवत आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बेळगावचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात करावा, यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेळगावचा समावेश महाराष्ट्रात करावा - गुलाबराव पाटील
मराठी माणसांवर 65 वर्षांपासून सातत्याने अन्याय केला जात आहे. त्यामुळे आम्ही केंद्रातील भाजपा सरकारचा काळ्या फिती लावून निषेध नोंदवत आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बेळगावचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात करावा, यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठी माणसांवर अन्याय
रविवारी जळगाव जिल्ह्यातील धरणगावात आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमा वाद आहे. मागच्या कालखंडात केंद्रात भाजपाचे सरकार होते. तेव्हाही आमचा संयुक्त महाराष्ट्रासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु, केंद्रातील सरकारने लक्ष दिले नाही. आजही केंद्रात भाजपाचे सरकार आहे. पण हा प्रश्न सोडवण्याची भाजपा सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे आम्ही आज शिवसेनेच्यावतीने केंद्रातील भाजपा सरकारचा काळ्या फिती लावून निषेध करत आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मराठी भाषिकांवर सुरू असलेला अन्याय थांबावा म्हणून बेळगाव, कारवार, निपाणी यांचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात करण्यात आला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी असून, त्यासाठी शिवसेनेच्या वतीने लढा सुरू आहे. अन्यथा बेळगावला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले पाहिजे, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.