महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश - पालकमंत्री गुलाबराव पाटील न्यूज

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. रोजगारासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग आले पाहिजे. जे उद्योग आहेत ते चांगल्या प्रकारे चालले पाहिजेत. नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील

By

Published : Nov 20, 2020, 4:56 PM IST

जळगाव -औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास सर्व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. उद्योजकांनी स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी उद्योजकांना केले. जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उद्योगमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनरुज्जीवन समिती सभा, जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची सभा पार पडली.

नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे-
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. रोजगारासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग आले पाहिजे. जे उद्योग आहेत ते चांगल्या प्रकारे चालले पाहिजेत. नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. याकरीता त्यांना आवश्यक असलेले रस्ते, वीज व पाणी या मुलभूत, पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महानगरपालिका, विद्युत वितरण कंपनी यांनी तातडीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. उद्योजकांच्या अडचणी सोडविताना त्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.

बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील



या विषयांच्या झाल्या मागण्या-
विद्युत वितरण कंपनीचा विद्युत भार कमी करणे, अतिरिक्त लावलेले मागणी शुल्क परत न देणे, वीज ग्राहकाची वर्गवारी बदलल्यानंतर फरकाची रक्कम परत न मिळणे, वीज जोडणी वेळेत न मिळणे या मागण्या दि. इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज संघटनने केल्या आहेत. लघु उद्योग भारती संघटनेच्यावतीने औद्योगिक वसाहतीमधील बंद पथदिवे सुरु करणे, काशिनाथ हॉटेलकडून एम सेक्टरकडे जाणेसाठी रस्ता बनविणे, औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या निचरा होण्यासाठी गटारी बांधणे, औरंगाबाद महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आदी मागण्या केल्या आहेत.

जिल्ह्यात स्थानिकांना रोजगार-

बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दंडगव्हाळ यांनी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात मोठे 18 उद्योग आहेत. यामध्ये 8, 994 इतका रोजगार उपलब्ध आहे. त्यापैकी 8,163 स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे. तर सुक्ष्म, लघु व मध्यम 37833 उद्योग असून यामध्ये 1 लाख 46 हजार 637 रोजगार आहेत. त्यापैकी 1 लाख 31 हजार 973 स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आल्याची माहिती दंडगव्हाळ यांनी दिली. या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वीज वितरण कंपनी, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग व महामंडळ, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसह इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीला आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदि उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details