जळगाव - जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजप-सेना युतीच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळवले असून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. या निवडणुकीत आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया देताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीच्या उमेदवारांनी विजय संपादन केल्यानंतर भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.ते पुढे म्हणाले की, स्व. उत्तमराव पाटलांपासून जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना कायम विजय मिळवत आली आहे. तीच परंपरा या निकालाने कायम राखली आहे. या निवडणुकीत आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जळगाव जिल्ह्यात दोन्ही जागांवर प्रचंड मताधिक्य मिळवले आहे. देशात जो विजयोत्सव साजरा होत आहे; त्यात आम्ही सहभागी तर होतोच. पण जळगाव आणि रावेरात आम्हाला जो विजय मिळाला, त्यामुळे आमच्यासाठी हा दुग्धशर्करा असा योग आहे, असेही ते म्हणाले.संपूर्ण देशभरात ज्या दोन ते तीन जागा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, त्यात जळगाव जिल्ह्यातील एक जागा निश्चित असेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.