महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2020, 4:25 PM IST

ETV Bharat / state

'आरे' प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जनतेचे हित पाहिले; देवेंद्र फडणवीसांना गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) चे कारशेड आरेतील 33 हेक्टर जागेवर बांधण्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. या कारशेडमुळे आरे जंगल नष्ट होणार होते. तर आदिवासीचे जीवन धोक्यात येणार होते. त्यांच्या शेतीवर परिणाम होणार होता. शिवाय त्यांच्या यात जमिनीही जाणार होत्या.

Fadnavis and patil
फडणवीस आणि पाटील

जळगाव -मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)चे कारशेड आरेतील 33 हेक्टर जागेवर बांधण्याचे प्रस्तावित होते. या कारशेडमुळे आरे जंगल नष्ट होणार होते. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतून मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जनतेचे हित पाहिले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

गुलाबराव पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली

गुलाबराव पाटील आज दुपारी जळगावात आले असता अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. आरे प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा यावेळी गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, तसे आमचेही म्हणणे होते की बुलेट ट्रेन हा विषयच चुकीचा आहे. मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता. मात्र, बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबादच का झाली? आरेच्या बाबतीत म्हणायचे झाले तर, पैशांच्या किंमतीपेक्षा तेथील नैसर्गिक वातावरण टिकवणे महत्त्वाचे आहे. आरेतील जागा सोडली तर आज मुंबईतील लोकांसाठी कोणतेही नैसर्गिक जंगलाचे ठिकाण उपलब्ध नाही. त्यामुळे आरे प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेचे हित पाहिले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

शेतकरी रस्त्यावर येईल, अशा विषयांना आमचा विरोधच -

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विषयावरही गुलाबराव पाटील यांनी आपले मत मांडले. नवीन कृषी कायद्यात काही मुद्दे चांगले आहेत तर काही चुकीचे आहेत. या विषयावर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार एक समिती नेमणार आहे. जे मुद्दे चांगले आहेत, त्यांचे स्वागत आहे. मात्र, ज्यामुळे शेतकरी रस्त्यावर येतील, शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशा विषयांना आमचा कायम विरोध असेल, असेही पाटील यांनी सांगितले.

हे काय महिलांच्या सन्मानाविषयी बोलतील ?

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर आज भाजपाकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येत आहे. भाजपाच्या आंदोलनावर देखील गुलाबराव पाटील यांनी सडसडून टीका केली. केंद्रात कॅबिनेट मंत्री असलेल्या पंजाबच्या हरसिमरत कौर यांना पंतप्रधान कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांनी एका शिपायाकडे आपला राजीनामा दिला. त्यांचा सन्मान झाला नाही. भाजपाच्या महिला आघाडीने त्यांच्यासाठी आंदोलन करावे. हा विषय लक्षात घेतला तरी भाजपाच्या महिला आघाडीचे आंदोलन सार्थकी लागेल. भाजपाला स्वतःला महिलांचा सन्मान करता येत नाही, हे काय महिलांच्या सन्मानाविषयी बोलतील? असा चिमटाही पाटील यांनी भाजपाला काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details