महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फडणवीसांनी खडसेंच्या रुपाने उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला' - eknath khadase news

एकनाथ खडसे यांनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या रुपात उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी भाजपाला का करावी वाटत नाही, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.

devendra fadnavis gulabrao patil
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुलाबराव पाटलांची टीका

By

Published : Sep 14, 2020, 3:36 PM IST

Updated : Sep 14, 2020, 4:56 PM IST

जळगाव-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. ग्रामीण भागातील ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी ते असेच प्रयत्न करत आहेत, अशी टीका करत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात फडणवीसांवर निशाणा साधला. खडसे विरुद्ध फडणवीस वादात त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत उडी घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुलाबराव पाटलांची टीका

गुलाबराव पाटील हे आज दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रणौत, नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेली मारहाण अशा विषयांवर आपल्या खास शैलीत मते मांडत भाजपवर टीकास्त्र डागले.

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते, पण पुन्हा बंद पडते. हे युद्ध कायम चालत राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट हातात घेतली म्हणजे ती धसास लावली पाहिजे. खडसे यांच्या रुपाने फडणवीस यांनी आमच्या उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. बोलायचे आणि पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

...यांना गोपीनाथ मुंढेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या आणि कंगना प्रकरणावरून गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर मिनिट टू मिनिट दाखवला जातो. परंतु, सुशांतसिंह राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट घेणारा होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टी उलगडल्या आहेत. असे असताना टीव्हीवर मात्र, चीनची बातमी दिसत नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. 52 टक्के रोजगार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कधी सीआयडी चौकशी होत नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंढेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही?, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे. बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. बिहारमध्ये भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.

हे बेशरम आमच्यावर काय टीका करतील?

मुंबईत नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली, याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील भाजपवर चांगलेच भडकले. ते म्हणाले, भाजप नाहक राजकारण करत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हे सैनिकांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे दीड वर्षे निलंबित राहिले. भाजपचे हे काही पहिले प्रकरण नाही. हे बेशरम लोक आमच्यावर काय टीका करतील? यांची आमच्यावर टीका करण्याची लायकी नाही. भाजपचे तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी देखील एका माजी सैनिकाला मारहाण केली होती. परंतु, आजपर्यंत त्यांना अटक झालेली नाही. त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून अटक करून घ्यावी. स्वतः सैनिकाला मारहाण करतात आणि नंतर टीव्हीसमोर येऊन शहाणपणा करतात. हे म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाँटे' असाच प्रकार आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा-NEET : परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या; पेपर देण्याआधीच उचलले पाऊल

Last Updated : Sep 14, 2020, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details