जळगाव -त्यांना आता मित्राची आठवण येत आहे. 'त्या' वेळेस तर आमच्याकडे पाहिलेच नव्हते, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी शिवसेनेची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.
मित्राला मित्र म्हणून रहायचे नसेल तर, त्यात दुःख करण्यात काही अर्थ नाही. मात्र, आज मित्र सोबत असता, तर नक्कीच बळ मिळाले असते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर दिली होती. चंद्रकांत यांना टोला लगावताना गुलाबराव पाटील यांनी आता त्यांना मित्राची आठवण येत आहे. 'त्या' वेळेस तर आमच्याकडे पाहिलेच नव्हते, मित्राची आठवण आली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता का असेना त्यांना आमची किंमत कळाली, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.