जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी, तर रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही उमेदवार कोट्यधीश असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील विवरणावरून समोर आले आहे. देवकरांकडे ५ कोटी, तर खडसे यांच्याकडे ४८ कोटींची मालमत्ता आहे.
गुलाबराव देवकरांकडे ५ कोटींवर स्थावर अन् जंगम मालमत्ता -
जळगाव लोकसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ५ कोटींवर स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्याचबरोबर बँकेचे कर्ज असून देवकरांवर २ गुन्हेही दाखल आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार देवकर यांच्याकडे ६६ लाख १ हजार ४५६ रूपये, तर त्यांच्या पत्नी छाया देवकर यांच्याकडे ६७ लाख ५१ हजार ६१ रूपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यात बँक खात्यातील ठेवी, बचत योजनेत गुंतवणुकीचा समावेश आहे. ३ कोटी ७३ लाख रुपयांची देवकर दाम्पत्याच्या नावावर स्थावर मालमत्ता आहे. त्यात शेतजमिनीचा समावेश आहे.
देवकर यांच्यावर १६ लाख, तर पत्नीच्या नावावर ६९ लाख ५२ हजार ६६१ रूपयांचे कर्ज आहे. मागील ५ आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्रात देवकर दाम्पत्याने ४५ लाख ७३ हजार ७०२ रुपयांचे उत्पन्न दर्शवले आहे. तसेच त्यांच्यावर जळगाव शहर पोलीस ठाणे आणि अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. देवकर यांचे शिक्षण कॉमर्समधून झाले आहे.