महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर भरवला बाजार...पालकमंत्र्यांनी खरेदी केला भाजीपाला - corona virus update maharastra

शेतमाल वाहतुकीची साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन जळगाव रनर्स ग्रुप तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर जळगावात 'सुरक्षित बाजार' भरवला आहे. या बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झालीच आहे. शिवाय सर्वसामान्य ग्राहकांना थेट शेतातून वाजवी दरात भाजीपाला, फळे मिळत आहेत.

gulab-raghunath-patil-visited-in-vegetable-market
gulab-raghunath-patil-visited-in-vegetable-market

By

Published : Apr 12, 2020, 4:14 PM IST

जळगाव- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे शेतमाल वाहतुकीची साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन जळगाव रनर्स ग्रुप तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर जळगावात 'सुरक्षित बाजार' भरवला आहे. या बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ तर उपलब्ध झालीच आहे. शिवाय सर्वसामान्य ग्राहकांना थेट शेतातून वाजवी दरात भाजीपाला, फळे मिळत आहेत. रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या बाजाराला भेट देऊन स्वतः भाजीपाला तसेच फळांची खरेदी केली.

'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर भरवला बाजार...

हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : कोरोना आणि लॉकडाऊनचा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावरील परिणाम

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. कालच हा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत पुढे वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. लॉकडाऊनच्या काळात शेतमाल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

दुसरीकडे बाजारात भाजीपाला व फळे येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला, फळे खरेदी करावी लागत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन जळगावातील जळगाव रनर्स ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरक्षित बाजार भरवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. प्रवेशद्वारावर हात धुवूनच ग्राहकाला आत सोडले जाते. त्यानंतर प्रत्येक ग्राहकाचे स्क्रिनिंग, सॅनिटायझिंग करुन सुरक्षित अंतर ठेवत खुर्चीवर बसवले जाते. कुपन देऊन भाजीपाला खरेदीसाठी सोडले जाते. हा बाजार लॉकडाऊन असेपर्यंत दररोज सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी या बाजाराला भेट दिली. संपूर्ण बाजार फिरुन त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासह सर्वसामान्य लोकांना वाजवी दरात भाजीपाला व फळे मिळावीत म्हणून जळगाव रनर्स ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या पदाधिकाऱ्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. राज्यभर हा जळगाव पॅटर्न वापरला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहनही केले.

ABOUT THE AUTHOR

...view details