जळगाव - 'वर्ल्ड आयडीबी डिसीस अवेअरनेस डे' निमित्त रविवारी जळगावात आतड्यांच्या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आयडीबी (पोटातील आतड्यांशी संबंधित आजार) या आजाराविषयी माहिती देण्यात आली. हा आजार टाळण्यासाठी काय केले पाहिजे, या आजाराने ग्रस्त रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.
'वर्ल्ड आयडीबी डिसीस अवेअरनेस डे' निमित्त जळगावात मार्गदर्शन कार्यशाळा - Awareness Day
जगभरात 19 मे हा दिवस 'वर्ल्ड आयडीबी डिसीस अवेअरनेस डे' म्हणून साजरा होतो. आयडीबी हा मनुष्याच्या पोटातील आतड्यांशी संबंधित आजार असून त्याचे अल्सरेटिव्ह कोलायटीस (मोठ्या आतड्याचा आजार) आणि क्रॉन्स डिसीस (लहान व मोठ्या आतड्याचा आजार) असे दोन प्रकार आहेत. पूर्वी पाश्चिमात्य देशात आढळणारा हा आजार आता भारतातही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. बदलती जीवनशैली, बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी हे या आजाराचे प्रमुख कारण मानले जाते.
जगभरात 19 मे हा दिवस 'वर्ल्ड आयडीबी डिसीस अवेअरनेस डे' म्हणून साजरा होतो. आयडीबी हा मनुष्याच्या पोटातील आतड्यांशी संबंधित आजार असून त्याचे अल्सरेटिव्ह कोलायटीस (मोठ्या आतड्याचा आजार) आणि क्रॉन्स डिसीस (लहान व मोठ्या आतड्याचा आजार) असे दोन प्रकार आहेत. पूर्वी पाश्चिमात्य देशात आढळणारा हा आजार आता भारतातही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. बदलती जीवनशैली, बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी हे या आजाराचे प्रमुख कारण मानले जाते. एका संशोधनानुसार, 2030 पर्यंत भारतात या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण असतील, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. या आजाराबाबत जागृती व्हावी म्हणून शोभा हॉस्पिटल अँड सुपर स्पेशालिटी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सेंटरतर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जर्मनीवरून प्रा.डॉ. क्रिस जर्जेस यांनी आजाराची लक्षणे, आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश चौधरी यांनी या आजाराच्या निदानासाठी तसेच उपचारासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती दिली.
सध्या 'आयडीबी' या आजाराचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. त्या खालोखाल या आजाराची रुग्णसंख्या ही भारतात आहे. भारतात या आजाराविषयी फारशी माहिती नसल्याने त्याला आळा घालण्यासाठी नेमके काय करावे, हे लोकांना समजत नाही. क्षयरोग, कर्करोगासारखाच हा आजार असून तो 18 ते 35 वयोगटात आढळून येतो. या आजाराने ग्रस्त व्यक्तीने योग्य ती खबरदारी घेतली तर तो आटोक्यात राहू शकतो. हा आजार पूर्णपणे बरा होईल, असे संशोधन जगात अजून झालेले नाही. मात्र, पथ्य पाळली तर त्यावर नियंत्रण ठेवता येते, असे यावेळी तज्ञांनी सांगितले.