जळगाव -कोरोना काळात गावात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवला. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे घडली.
महिलांनी अडवला पालकमंत्र्यांचा ताफा पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून अडवला ताफा -
जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यात हजारो हेक्टरवरील केळी बागांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज दोन्ही तालुक्यांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान उचंदा गावातील महिलांनी पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून त्यांचा ताफा अडवला. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता.
गावात 15 दिवसांपासून पाणी नाही -
संतप्त महिलांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवून पाणीटंचाईची समस्या मांडली. ऐन कोरोना काळात गावात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. महिलांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आम्हाला पाणी उपलब्ध करून घ्या, तुम्ही पाण्याचे मंत्री आहेत. आमच्या गावात 15 दिवसांपासून पाणी नाही. गावातील सरपंच, ग्रामसेवक आमची समस्या ऐकून घेत नाहीत, अशा शब्दांत महिलांनी आपली व्यथा मांडली.
ग्रामसेवक, बीडीओ यांना दिले कार्यवाहीचे निर्देश-
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या अडचणी जाणून घेत त्यांना समस्येचे निराकारण करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक आणि बीडीओ यांना तातडीने पाणीटंचाई सोडविण्याचे निर्देश दिले. याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून तो आमदारांना सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान, गावातील महिलांनी पाणीटंचाईची समस्या मांडली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - 'ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर येऊन देशातील गरिबांची दशा पाहावी'; ओवैसींची मोदींवर टीका