महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

''कृषी विभागाने शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात'' - जळगाव ताज्या बातम्या

जिल्ह्यातील कृषी व पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी विभागाचा आढावा घेऊन विविध सुचना केल्या.

guardian minister gulabrao patil take review meeting of agriculture department in jalgaon
''कृषी विभागाने शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात''

By

Published : Nov 2, 2020, 6:54 PM IST

जळगाव-शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, याकरीता राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सुचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कृषी व पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक अजिंठा विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

यंदा पाऊस चांगला झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. याकरीता येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पिकांचे बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. पोकरा योजनेतंर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या शेतीशाळांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व तरुण शेतकऱ्यांचा समावेश करावा. जिल्ह्यात शेतीपुरक उद्योग म्हणून दुग्धव्यवसाय वाढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सुचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीत आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी संभाजी ठाकूर, कृषिउपसंचालक अनिल भोकरे, आत्माचे मधुकर चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषिअधिकारी, कृषिविज्ञानकेंद्र ममुराबादचे हेमंत बाहेती, पालचे महेश महाजन यांच्यासह कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


''पशुवैद्यकीय महाविद्यालय जागा हस्तांतरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करा''

शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळता यावे, याबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांना जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, याकरीता सावखेडा येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरु करण्याकरीता आवश्यक असलेली जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 'विकेल ते पिकेल' या योजनेतंर्गत जिल्ह्यात भरताची वांगी, खपली गहू, केळीपासून पुरक उद्योग सुरु करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. नानाजी देशमुख कृषिसंजीवनी योजना, पोकरा व स्मार्ट योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व उत्पादक कंपन्याना लाभ मिळवून द्यावा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

डिसेंबरमध्ये जिल्ह्यात होणार भरीत महोत्सव-

जळगावमधल्या भरताच्या वांग्याना जीआय मानांकन मिळाले आहे. या वांग्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्याचा अधिकाधिक प्रचार व प्रसार व्हावा, याकरीता जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात भरीत महोत्सवाचे आयोजन करावे, तसेच नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून भरीत भाकरीचा स्टॉल लावण्याची सुचना कृषिविभागास दिली. त्यानुसार हा महोत्सव घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी ठाकूर यांनी बैठकीत दिली. बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘विकेल ते पिकेल’ या योजनेतंर्गत भरताचे वांगे, केळीपासून बनविलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉलचे उद्धाटन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details