जळगाव- जिल्ह्यातील भडगाव आणि पाचोरा तालुक्यात गेल्या २ दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी वादळासह काही प्रमाणात गारपीट देखील झाल्याने केळी, पपई तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी सकाळी भडगाव तालुक्यात पाहणी दौरा करत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
जळगावात मान्सूनपूर्व पावसाने पिकांची नासाडी; पालकमंत्र्यांसमोर बळीराजाने मांडल्या व्यथा - farmers
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला. वडजी, पिचर्डे, पांढरद, बात्सर या गावाच्या शेतशिवारात फिरून त्यांनी केळी, पपई बागांच्या नुकसानीची पाहणी केली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांशी चर्चा केली.
भडगाव तालुक्यात गिरणा नदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर केळी, पपई, लिंबू तसेच इतर पूर्वहंगामी पिकांची लागवड केली जाते. मात्र, २ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी मान्सूनपूर्व पावसामुळे केळीसह पपई आणि लिंबूच्या बागांचे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे अक्षरशः उद्धवस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे निसवणीवर आलेले घड तुटून जमिनीवर कोसळले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला. वडजी, पिचर्डे, पांढरद, बात्सर या गावाच्या शेतशिवारात फिरून त्यांनी केळी, पपई बागांच्या नुकसानीची पाहणी केली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांशी चर्चा केली. पाहणीनंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमाच्या चौकटीपेक्षा जास्तीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी महाजन यांनी शेतकऱ्यांना दिले.
दरम्यान, वादळामुळे भडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे २ दिवसांपासून या गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामस्थांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आधी वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी आग्रही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. त्यावर गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. वादळी मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा, असेही आदेश गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या दौऱ्यात महाजन यांच्या सोबत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.