महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव महानगर शिवसेनेत वर्चस्ववादातून गटबाजी? विविध आंदोलनांमधून येतोय प्रत्यय - गुलाबराव पाटील न्यूज

शहरातील विविध प्रश्न तसेच समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांकडून आंदोलने होत आहेत. प्रत्येक आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे चेहरे वेगळे दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेत गट पडले की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे.पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच संपूर्ण जिल्ह्याच्या पक्षसंघटनेवर लक्ष ठेऊन आहेत. अशा परिस्थितीत त्यांनीच पक्षांतर्गत कुरबुरी सोडवण्याची गरज आहे.

jalgaon shivsena
जळगाव शिवसेना

By

Published : Aug 29, 2020, 9:19 PM IST

जळगाव-महानगर शिवसेनेत वर्चस्ववादातून गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव शहरातील विविध प्रश्न तसेच समस्यांना वाचा फोडण्यासाठी महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजप विरोधात शिवसेनेच्या वतीने होणाऱ्या विविध आंदोलनांमधून त्याचा प्रत्यय येत आहे. प्रत्येक आंदोलन हे वेगवेगळ्या गटांकडून होत असल्याने गटबाजीच्या चर्चेला दुजोरा मिळत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून मात्र, गटबाजीचे खंडन करत, पक्षसंघटन मजबूत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, राज्याच्या सत्तेत केंद्रस्थानी असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पक्षसंघटनेतील कुरबुरींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जळगाव महानगर शिवसेनेत वर्चस्ववादातून गटबाजी?

जळगाव शहर महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या जळगाव महानगर शिवसेनेत सध्या वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. शहरातील विविध प्रश्न तसेच समस्यांना वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या गटांकडून आंदोलने होत आहेत. प्रत्येक आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे चेहरे वेगळे दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेत गट पडले की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे. गेल्या पंधरवड्यात शहरातील विकासकामे, रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छता अशा विविध प्रकारच्या विषयांवरुन शिवसेनेच्या वतीने आंदोलने झाली, महापालिका आयुक्तांना निवेदने देण्यात आली. परंतु, प्रत्येक वेळी शिवसेनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिनिधित्व केले. म्हणून महापालिकेच्या वर्तुळात शिवसेनेतील गटबाजीची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे जळगाव महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. पण, आता शिवसेना विरोधी बाकावर आहे. 57 नगरसेवकांसह भाजप सत्तेत आहे.

हेही वाचा-नागपूरनंतर जळगाव पालिकेत रंगलाय अधिकारी विरुद्ध शिवसेना पदाधिकारी सामना!

शिवसेनेकडे अभ्यासू नगरसेवक असल्याने अवघे 15 नगरसेवक असतानाही शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना सभागृहात वेळोवेळी भाजपला खिंडीत गाठण्याची संधी सोडत नाही. परंतु, अलीकडच्या काळात शिवसेनेत विसंवाद वाढल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्याचे सांगत आहेत. पक्षसंघटन मजबूत असून, प्रत्येक जण आपल्यापरीने जनतेचे प्रश्न, अडचणी मांडण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, हाच शिवसेनेचा उद्देश असतो. त्यामुळे आंदोलन कोण करतोय, प्रश्न कोण मांडतोय याला महत्त्व नाही. विषय कुणीही मांडला तरी तो शिवसेनेच्या माध्यमातून मांडला जात असतो, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली महानगर शिवसेनेचे संघटनात्मक काम सुरू आहे. घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेश जैन सध्या राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच संपूर्ण जिल्ह्याच्या पक्षसंघटनेवर लक्ष ठेऊन आहेत. अशा परिस्थितीत त्यांनीच पक्षांतर्गत कुरबुरी सोडवण्याची गरज आहे.

पक्षांतर्गत वर्चस्व वादातूनच गटबाजीचा प्रकार सुरू आहे. खुद्द काही पदाधिकारी तसेच कार्यकर्ते खासगीत चर्चा करताना हे मान्य करतात. शहरातील विविध प्रश्न तसेच समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी होणारी आंदोलने जर शिवसेनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली तर ती अधिक प्रभावी ठरतील. शिवाय सक्षम विरोधी पक्ष म्हणूनही शिवसेनेची सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर वेगळी छाप पडेल. यासाठी सर्वांनी एकमेकांमधील मतभेद, गट-तट विसरणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details