जळगाव -आकाशगंगेत आज सायंकाळी एक अद्भुत खगोलीय घटना घटणार आहे. सुमारे ४०० वर्षांनंतर या अद्भुत खगोलीय घटनेचा योग येत आहे. आज सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला गेल्या ४०० वर्षांत न दिसलेल्या गुरू आणि शनीच्या महायुतीचा विलक्षण नजारा बघायला मिळणार आहे. या योगामुळे सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत.
खगोलीय भाषेत या घटनेला 'ग्रेट जंक्शन' म्हटले जाते, अशी माहिती जळगावातील खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
सुमारे ४०० वर्षांनंतर अद्भुत खगोलीय घटनेचा योग; आज सायंकाळी पाहता येणार गुरू-शनीची युती! - खगोलीय घटना शनि गुरूची युती
आज खगोलप्रेमीसाठी अवकाशात अद्भुत नजारा पाहता येणार आहे. गुरु आणि शनी या दोन ग्रहाची युती आज पाहता येईल. जवळपास ४०० वर्षानंतर हा खगोलीय नजराणा खगोल प्रेमीसाठी एक पर्वणीच ठरणारा असेल.
![सुमारे ४०० वर्षांनंतर अद्भुत खगोलीय घटनेचा योग; आज सायंकाळी पाहता येणार गुरू-शनीची युती! अद्भुत खगोलीय घटनेचा योग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9951215-thumbnail-3x2-a.jpg)
ही अद्भुत खगोलीय घटना आपल्याला साध्या डोळ्यांनी तर दिसणार आहेच; पण टेलिस्कोपमधून गुरू त्याच्या चार चंद्रांसह आणि शनी त्याच्या कड्यांसह एकाच वेळी ही महायुती बघता येणार आहे. याआधी १६ जुलै १६२३ ला अशी महायुती झाली होती आणि यानंतर आता भविष्यात १५ मार्च २०८० ला या घटनेचा पुन्हा अनुभव घेता येईल.
खगोलतज्ज्ञांचे आवाहन-
गुरू व शनीच्या महायुतीचा हा अद्भुत नजारा १२ इंचाच्या परावर्तित दुर्बिणीतून सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत मु. जे. महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या छतावर, जळगाव खगोलप्रेमी ग्रुप आणि मु. जे. महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बघता येणार आहे, असे खगोल अभ्यासक अमोघ जोशी व प्रा. प्रज्ञा जंगले यांनी कळविले आहे.