जळगाव - महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जळगावकरांना मूलभूत सुविधा देखील मिळणे कठीण झाले आहे. इतकेच नाही, तर जळगावकरांच्या नशिबी मृत्यूनंतरही मरणयातनाच आहेत. मृत बालकांच्या दफनविधीसाठी शहरात पुरेशी जागा उपलब्ध नाही. नेरीनाका स्मशानभूमीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागी सध्या दफनविधी होतात. परंतु, याठिकाणी आता जागा शिल्लक राहिलेली नाही. ही समस्या असताना महापालिकेच्यावतीने येथे कचरा डेपो उभारण्यात आला असून त्याठिकाणी कचऱ्याचे विलगीकरण होते. त्यामुळे दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना कचऱ्यातून वाट काढत कचऱ्यातच दफनविधी उरकावा लागत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
'इथं' मृत्यूनंतरही मरणयातनाच, बालकांचा दफनविधी कचऱ्यात! शहरातील अॅड. शैलेश देसले यांचा मुलगा भार्गव याचे निधन झाले होते. बुधवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देसले कुटुंबीय आपल्या आप्तस्वकियांसह भार्गवचे पार्थिव दफनविधीसाठी नेरीनाका परिसरातील स्मशानभूमीत घेऊन गेले. मात्र, याठिकाणी त्यांना कचऱ्यातून वाट काढावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे कचऱ्यामुळे दफनविधीसाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे जमलेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मशानभूमीत सर्वत्र कचरा साचलेला असल्याने दफनविधी नेमका कुठे करावा? असा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी देसले कुटुंबीयांनीच साफसफाई करत दफनविधी उरकला. महापालिका प्रशासनाने किमान स्मशानभूमीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी देसले कुटुंबीयांनी केली.
अनेक वर्षांपासून जागेची मागणी -
हिंदू समाजातील मृत बालकांचा दफनविधी करण्यासाठी महापालिकेने नेरीनाका परिसरात असलेल्या स्मशानभूमीच्या शेजारी नाल्याच्या किनारी जागा दिली आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून दफनविधी होत आहेत. परंतु, आता याठिकाणी जागा अपूरी पडत आहे. अनेकदा दफनविधीसाठी खोदकाम करताना मृतदेहाचे सांगाडे बाहेर निघतात. अशावेळी पुन्हा दुसऱ्या जागी खोदकाम करावे लागते. काही वेळा तर वरवर खोदकाम करून दफनविधी होतात. त्यामुळे कुत्रे मृतदेह उकरून काढतात. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. महापालिकेने दफनविधीसाठी कुठेतरी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा येथे होणारे कचऱ्याचे विलगीकरण बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, महापालिकेकडून या विषयाला बगल दिली जात आहे. मध्यंतरी आदिवासी भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हाही महापालिकेने वेळकाढू धोरण अवलंबले होते. आता तरी तसा प्रकार घडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लवकर पर्याय शोधण्याचे स्थायी समितीच्या सभापतींचे आश्वासन -
काही नागरिकांनी स्मशानभूमीच्या विषयासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. परंतु, सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे याप्रकरणी स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी पुढाकार घेतला. या समस्येवर लवकर पर्याय शोधण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपण लवकरच याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेऊ आणि उपाययोजना करू, असेही त्या म्हणाल्या.