जळगाव -ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात गुरूवारी दुसऱ्या दिवशी ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तहसील कार्यालयाच्या आवारात निवडणुकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच जात वैधता प्रमाणपत्राच्या पावतीसाठीदेखील इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची दिवसभर चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
जळगाव जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जळगाव तालुक्यासह जिल्हाभरातून गुरूवारी ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सकाळी साडे नऊपासूनच इच्छुकांनी तहसील कार्यालयात ग्रामपंचायतनिहाय टेबलावर जावून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. जळगाव तालुक्यातून तीन अर्ज दाखल झाले आहे. त्यामध्ये ममुराबाद, आसोदा तसेच चिंचोली गावातून प्रत्येक एक अर्ज गुरूवारी दाखल झाला आहे.