जळगाव - कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. परंतु, काहीतरी उत्पन्नाचा स्त्रोत हवा म्हणून एसटी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. मात्र, ही सेवा सुरू करताना एसटी महामंडळाने मालवाहतूक गाडी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांबाबत कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही. त्यामुळे त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यात व परराज्यात माल घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिकडून परत येताना वेळेवर माल मिळाला नाही तर स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करत मुक्कामासह खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागत आहे. पिण्याचे पाणी, जेवण, झोपण्यासाठी जागा अशा सुविधाही त्यांना मिळत नाहीत. काही ठिकाणी एसटीच्या विश्रामगृहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने कोरोनाच्या काळात त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे एसटीची प्रवासी वाहतूक सेवा देखील बंद करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी टप्प्याटप्प्याने वाढत गेला. अशात प्रवासी वाहतूक सेवा सुरू करता येत नसल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. या परिस्थितीत एसटीला आधार म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज होती. याच अनुषंगाने एसटी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी बसेसमध्ये बदल करण्यात आले. आता एसटी महामंडळाकडून प्रत्यक्षात मालवाहतूक सेवा सुरू आहे. परंतु, त्याला अपेक्षित असा प्रतिसाद नसल्याने मालवाहतूक बस चालवणाऱ्या चालकांसह इतर कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. असे असताना एसटी प्रशासन मात्र, कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
जळगाव विभाग राज्यात अव्वल मात्र, कर्मचाऱ्यांच्या सुविधांचे काय?
एसटी महामंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार, एसटीच्या जळगाव विभागात 28 मेपासून बसेसद्वारे मालवाहतुकीला सुरुवात झाली आहे. पहिली मालवाहू बसही जळगाव येथून माल घेऊन यवतमाळला धावली. यानंतर विविध उद्योगांकडून मालाची वाहतूक करण्यासाठी बसची मागणी वाढली. अवघ्या दीड महिन्यातच 450 फेऱ्यांमधून 28 लाख 50 हजारांची कमाई करत जळगाव विभाग राज्यात अव्वल ठरला. ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक आगारात अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच माल वाहतुकीसाठी चालक व ठराविक कर्मचाऱ्यांच्या ड्यूट्याही लावण्यात आल्या आहेत. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जोरावर एसटीने घसघशीत उत्पन्न मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला, त्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला मात्र, एसटी प्रशासनाला वेळ नाही.