महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यासाठी समाधानाची बाब; 21 जण कोरोनामुक्त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज - जळगाव कोरोना

नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लाॅकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित राहावे, अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.

corona virus
corona virus

By

Published : May 11, 2020, 10:06 AM IST

जळगाव -कोरोनावर मात करीत जळगाव जिल्ह्यातील आणखी 21 जण आज सायंकाळी आपापल्या घरी परतले. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड हाॅस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित 172 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये अमळनेर येथील 9, भुसावळ येथील 7, जळगाव येथील 5 व्यक्तींचा समावेश आहे. तर यापूर्वीच जळगाव व अमळनेर येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 23 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आवश्यक तो कालावधी पूर्ण झाल्याने तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसल्याने त्यांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डाॅ. गायकवाड व त्यांची टीम उपस्थित होती. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या व्यक्तींना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली 7 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डाॅ. खैरे यांनी सांगितले.

असे असले तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लाॅकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित राहावे, अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details